Sunday, October 19, 2008

नमस्कार गृहिणींनो, इकडे लक्ष द्या. मी तुमच्यासाठी हा खास ब्लॉग आणत आहे. मला स्वत:ला स्वयंपाक जेमतेमच येतो ही गोष्ट मी तुमच्या लक्षात सर्वात प्रथम आणत आहे. परंतु माझ्याकडे जो काही संग्रह आहे आणि मी ज्या काही टिप्स किंवा रेसिपीज करून बघितल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते.

सर्वात प्रथम मी काही टिप्स घेऊन आपले स्वागत माझ्या या ब्लॉगव्दारे करणार आहे.

तिरंगी वड्या

साहित्य - रवा व बेसन व खोबऱ्याचा किस समप्रमाणात साखर-रवा व बेसनाला सम प्रमाण व खोबऱ्याच्या किसाला १ वाटी पाऊण वाटी साखर याप्रमाणे रंग पिवळा व हिरवा, वेलची पूड, तूप
कृती -
प्रथम बेसन व रवा तुपात वेगवेगळा भाजावा. ऒल्या नारळाचा किस असल्यास तोही चांगला परतावा. नंतर या तीनही साहित्याचा अंदाज घेऊन प्रमाणाने साखर घेऊन त्याचा पाक करावा. तो पाक तीन वेगवेगळ्या भांड्यात करावा. रव्याच्या पाकात हिरवा व बेसनाच्या पाकात पिवळा व किसाचा पाक तसाच ठेवावा. पाक घट्ट करून एकात रवा, दुसऱ्यात वेसन व पांढऱ्या पाकात नारळाचा किस टाकावा. नंतर खालीवर रवा व बेसन व नारळाचा पांढरा किस मध्ये येईल अशा तऱ्हेने त्याचे एकावर एक थर द्यावेत. मग वड्या पाडाव्यात.

शेंगदाण्याचे पिठले

साहित्य - २ वाट्या दाण्याचा कूट, तिखट, मीठ व फ़ोडणीचे साहित्य, कोथिंबीर
कृती -
प्रथम १ वाटी पाणी फ़ोडणीस घालावे. (दाण्याच्या कुटाच्या अर्धे पाणी) त्यात हिंग, तिखट, मीठ घालावे. पाण्यास उकळी आल्यावर त्यात दाण्याचा कूट घालावा. नंतर चांगले ढवळून वाफ़ आणावी. हा पदार्थ उपवासालाही चालतो. मात्र हिंग व कोथिंबीर टाकू नये. इतर वेळी टाकावे.

पनीर टिप्स

१ लिटर दूध, पाव चमचा सायट्रीक ऍसिड.
प्रथम दूध उकळी येईपर्यंत तापवून घ्या. थोडया पाण्यात सायट्रीक ऍसिड विरघळून घ्या . दुधाला उकळी आल्यावर लगेचच सायट्रिकचे पाणी घाला. दूध उकळत फ़ाटू लागेल. चोथा व पाणी वेगळे होईल. गॅस बंद करा. गरम गरम चोथा गाळून फ़डक्यात बांधून घ्या. पूर्ण पाणी निथळल्यावर वजनदार खलबत्ता ठेवून पनीर बांधलेला कपडा दाबून ठेवा. २ ते ३ तास पनीर दाबून ठेवा. नंतर वड्या कापून वापरा.

टिप्स -
१. पनीरचे काढलेले पाणी थोडे विरजण घालून दुसरे दिवशी कढीसाठी वापरू शकतो.
२. पनीर बनवतांना उरलेले पाणी भात शिजवण्यासाठी वापरा. छान चवीचा भात तयार होईल.
३. उरलेले पाणी वापरून कणिक भिजवा. पोळी मऊ व चवदार वाटेल.